रत्नागिरी : गरीब, मजूर व कामगारांसाठी अवघ्या दहा रुपयांत गरम जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळी योजनेला सध्या आर्थिक घरघर लागली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक केंद्रे बंद पडली आहेत. जिल्ह्यात मंजूर असलेल्या २६ केंद्रांपैकी १४ केंद्रे सध्या बंद असून, केवळ १२ केंद्रे कार्यरत आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून थकित असलेले शासनाचे अनुदान मिळाले नसल्याने केंद्रचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. मार्च ते जून या कालावधीतील २६ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान रखडल्याने अडचणी वाढल्या होत्या. अखेर ४ जुलै रोजी ही रक्कम प्राप्त झाली असून, मार्च आणि एप्रिल महिन्यांतील देयके लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
दररोज सरासरी १,४८० लाभार्थी या थाळीचा लाभ घेत असल्याची नोंद असून, भात, चपाती, आमटी, भाजी असा भरगच्च बेत असलेली ही थाळी गरजूंसाठी जीवनरेषा ठरली आहे. शासनाकडून प्रत्येक थाळीसाठी ४० रुपयांचे अनुदान दिले जाते, तर लाभार्थीकडून १० रुपये घेतले जातात. मात्र महागाई वाढल्याने हे अनुदान अपुरे पडू लागले आहे, अशी केंद्रचालकांची भावना आहे.
कोरोनाच्या काळात ही थाळी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. सध्याच्या आर्थिक ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडला असून, त्यामुळे शिवभोजन योजनेच्या स्थायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही योजना बंद करण्याच्या हालचालींचीही चर्चा सुरू आहे.
शिवभोजन थाळी बंद होऊ नये, अशी केंद्रचालकांची मागणी आहे. रत्नागिरीतील केंद्रचालक गणेश धुरी म्हणाले, “गरजूंना पोटभर अन्न देणारी ही योजना आहे; आम्ही यामार्फत लोकांना पोटभर जेवण देतो. शासनाने वेळेवर अनुदान द्यावे, काही निर्बंध घालून दिले तरी चालतील; परंतु ही योजना बंद होऊ नये. ही योजना शासनाला आशीर्वाद मिळवून देणारी ठरते.”
शासनाच्या पातळीवर निधी मंजुरीचा वेग वाढवून ही गरजूंसाठीची योजना अखंड सुरू राहावी, हीच अपेक्षा आहे.
रत्नागिरी: शिवभोजन थाळीचे अनुदान रखडले; जिल्ह्यातील २६ पैकी १२ केंद्र सुरू
