रत्नागिरी: शहरातील थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत प्रस्तावित असलेल्या कम्युनिटी सेंटरच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. प्रशासनाने उच्च न्यायालयासमोर कम्युनिटी सेंटर उभारताना सध्या अस्तित्वात असलेल्या बुद्धविहाराला कोणताही धक्का न लावता किंवा त्याचे नुकसान न करता काम केले जाईल, अशी माहिती दिली होती. ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भातील रिट याचिका दाखल करण्यास नकार देत ती फेटाळून लावली आहे. यामुळे आता कम्युनिटी सेंटर उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
रत्नागिरीतील रत्नदीप कांबळे यांनी थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत होणाऱ्या या कम्युनिटी सेंटरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी कम्युनिटी सेंटर बांधण्यास मिळालेली मंजुरी तसेच नगर परिषदेने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने सुरुवातीला बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले होते.
यानंतर रत्नागिरी नगर परिषद आणि प्रशासनाने न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या थिबाकालीन बुद्धविहाराला कोणतेही नुकसान पोहोचवले जाणार नाही, तसेच त्याला धक्का न लावता कम्युनिटी सेंटर उभारले जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले. प्रशासनाच्या या उत्तराने समाधानी होऊन न्यायालयाने याचिका फेटाळण्याचा निर्णय दिला.
गेल्या वर्षभरापासून थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या कम्युनिटी सेंटरवरून वाद सुरू होता. या कम्युनिटी सेंटरच्या उभारणीसाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून सुमारे ७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
दरम्यान, बौद्ध समाजातील विविध संघटनांनी थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत कम्युनिटी सेंटरऐवजी बुद्धविहारच उभारण्याची मागणी केली होती. तसेच, संबंधित जागा शासनाच्या ताब्यात न ठेवता ती बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, अशीही त्यांची मागणी होती. मात्र, न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे आता कम्युनिटी सेंटरच्या बांधकामाला गती मिळण्याची शक्यता आहे.