GRAMIN SEARCH BANNER

लांजातील माचाळमध्ये पर्यटकांच्या बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीचे पाऊल

Gramin Varta
8 Views

सूचना फलक व कचरा संकलन शेडची व्यवस्था; बेशिस्त वागणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

लांजा : तालुक्यातील निसर्गरम्य माचाळ येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून बेशिस्तपणाचे प्रकार सातत्याने वाढू लागले आहेत. मद्यधुंद अवस्थेतील पर्यटक निसर्गाचे सौंदर्य आणि स्थानिक शांततेला गालबोट लावत असल्यामुळे पालू ग्रामपंचायतीने कठोर भूमिका घेतली आहे.

माचाळ गावात पर्यटकांनी कचरा न करता, मद्यप्राशन टाळून, शिस्तबद्ध पद्धतीने वागावे, यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय कचरा टाकण्यासाठी खास संकलन शेड उभारण्यात आले असून त्याचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

प्रकृतीच्या सान्निध्यातील अनाग्रही वागणूक

हिरव्या वनराईत वेढलेले, नागमोडी वळणांचे रस्ते, धुक्याची चादर आणि कोसळणारे धबधबे अशा सुंदरतेमुळे माचाळ हे गाव पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मात्र काही पर्यटक मद्यपान करून उन्मत्त वर्तन करतात, बाटल्या फोडतात, कचरा रस्त्यावर फेकतात आणि इतर पर्यटकांना व स्थानिक ग्रामस्थांना त्रास देतात.

याच पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांनी नुकतीच काही बेशिस्त पर्यटकांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. माचाळचे सौंदर्य टिकवण्यासाठी ग्रामपंचायतीचा हा पुढाकार स्वागतार्ह मानला जात आहे.

निसर्ग माझा आहे आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी देखील माझी…”

“माचाळ हे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध होत आहे. कोकणी संस्कृती आणि निसर्गाचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत आहे. मात्र, निसर्गाला बाधा पोहोचणार नाही याची काळजी पर्यटकांनीच घ्यावी.”

शहानवाज सारंग, पर्यटकदूत, माचाळ

सूचना पाळा, सौंदर्य जपा

“मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माचाळमध्ये सूचना फलक व कचरा संकलन शेड लावण्यात आले आहेत. पर्यटकांनी सूचना पाळून निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.”

सागर गाडे, उपसरपंच, पालू ग्रामपंचायत

Total Visitor Counter

2670623
Share This Article