GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : मांडवी येथे मित्रांमध्ये वाद पेटला; जोरदार हाणामारी, जीवे मारण्याची धमकी

Gramin Varta
948 Views

रत्नागिरी: शहरातील मांडवी नाईक कंपनीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गुरुवार ०२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणावर दगडफेक करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या आयुष पारकर (रा. राजीवडा) नामक आरोपीने अजय सुभाष तोडणकर (वय २७, रा. चवंडेवठार) यांच्या डोक्यावर दगड मारून त्यांना जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर जखमी अजय तोडणकर यांनी शुक्रवारी ०३ ऑक्टोबर रोजी रात्री रत्नागिरी पोलिसांत आयुष पारकर विरोधात तक्रार दाखल केली. यानुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या रात्री सुमारे १०.३० वाजता अजय तोडणकर, त्यांचा मित्र संदीप शिंदे (रा. खडपेवठार), दत्तात्रय खोडे (रा. एस.टी स्टॅण्ड जवळ) आणि आरोपी आयुष पारकर हे सर्वजण दोन स्कूटर्सने मांडवी नाईक कंपनीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गेले होते. अजय तोडणकर आपल्या स्कुटरवर बसलेल्या संदीप शिंदे यांच्याशी बोलत असताना, दत्तात्रय खोडे यांच्या गाडीवर बसून आलेल्या आयुष पारकरने, कोणतेही ठोस कारण नसताना, दारूच्या नशेत अजय यांची ‘लायकी’ काढून त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.

यावर अजय तोडणकर यांनी आयुष पारकरला जाब विचारला असता, त्याचा राग आरोपीला पारकरला अनावर झाला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, इतर दोन मित्रांच्या समक्ष आयुष पारकरने तेथे पडलेला एक दगड उचलून थेट अजय तोडणकर यांच्या डोक्याच्या वरिल भागास मारला, यामध्ये ते गंभीर जखमी झाले. इतकेच नाही तर, आरोपी आयुष पारकरने अजय यांना शिवीगाळ करत ठार मारून टाकीन अशी धमकी देखील दिली आहे.

घटनेनंतर जखमी झालेल्या अजय तोडणकर यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. आरोपी पारकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3366873
Share This Article