GRAMIN SEARCH BANNER

दोन गुंठ्यापर्यंतच्या व्यवहारांची सातबाऱ्यावर नोंद शक्य; तुकडेबंदीसंदर्भातील कार्यपद्धती जाहीर

Gramin Varta
169 Views

पुणे : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता नि:शुल्क नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्यामुळे जमिनींच्या नोंदी कशा प्रकारे घ्याव्यात, अशा व्यवहारांची दस्त नोंदणी कशी करावी, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

आतापर्यंत दोन गुंठ्यांपर्यंतच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यास त्याचा फेरफार न झाल्याने सातबाऱ्यावर नोंद करण्यात येत नव्हती. ती नोंद आता या नियमामुळे व्यवहार नियमित झाल्यानंतर करणे शक्य होणार आहे.

राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत, तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासारख्या प्राधिकरणाच्या हद्दीतील तुकडेबंदी कायदा राज्य सरकारने रद्द करण्याचे आदेश यापूर्वीच काढले आहेत. त्याबाबत नुकतीच अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार, १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेले जमीन व्यवहार हे नव्या आदेशाने विनाशुल्क नियमित होणार आहेत.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षकांसह विभागीय आयुक्तांकडे याबाबतच्या कार्यपद्धतीसंदर्भातील आदेश पाठविण्यात आले आहेत.


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासारख्या (पीएमआरडीए) नियोजन प्राधिकरणांच्या क्षेत्रातील निवासी किंवा वाणिज्यिक विभाग, छावणी क्षेत्रातील जमिनी, प्रादेशिक आराखड्यात अकृषिक वापरासाठी दर्शविलेले क्षेत्र आणि गावठाणांच्या हद्दीलगतचे २०० मीटरच्या आतील क्षेत्र या ठिकाणीही तुकडेबंदी कायदा लागू असणार नाही. त्यामुळे या भागात पूर्वी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले व्यवहार आता नियमित होणार आहेत.

हे व्यवहार नियमित करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात न आल्याने व्यवहार कसे नियमित होणार, असा प्रश्न होता. सरकारने आता ही कार्यपद्धती निश्चित केली असून, सहसचिव संजय बनकर यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत.

नवीन बदल काय?

दोन गुंठ्यापर्यंतच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीची सातबाऱ्यावर नोंद शक्य.
इतर हक्कांत असलेले नाव आता मुख्य कब्जेदार म्हणून लावण्यात येणार.
प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे नोंदणीकृत दस्तावेजाद्वारे झालेले हस्तांतर नियमित केल्यानंतर संबंधित खरेदीदाराचे नाव अधिकार अभिलेखात नोंदविल्यावर जमिनीचे पुन्हा हस्तांतर करण्यास प्रतिबंध नाही.
बँक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे १११ कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न फसला! सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंतर्गत चौकशी सुरू…

महसूल विभागाची कार्यपद्धती

तुकड्याच्या नोंदणीकृत दस्तांच्या आधारावर झालेला फेरफार रद्द केला असेल, तर अशा प्रकारच्या नोंदीचा शोध अधिकार अभिलेखातून घेऊन त्या नोंदी नोंदणीकृत दस्ताच्या आधारावर झाल्याची खात्री करण्यात येणार आहे. त्यानंतर या नोंदी पुनरुज्जीवित करण्यात येतील. या प्रकारच्या व्यवहारांची नव्याने फेरफार नोंदणी घेण्यात येणार आहे. तुकड्याच्या नोंदणीकृत दस्तांच्या आधारावर झालेला फेरफार मंजूर करण्यात आला असेल, तर खरेदीदाराचे नाव इतर हक्कांत घेण्यात येणार आहे. सातबाऱ्यावर यापूर्वी नोंद झाली असल्यास त्यात ‘तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार’ असलेली नोंद आता रद्द होणार आहे.

नोंदणीसाठी…

अनोंदणीकृत (रजिस्टर न झालेल्या) दस्तांच्या आधारे एक-दोन गुंठे जमीन खरेदी व्यवहार झाले असतील, तर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून खरेदी-विक्री झालेल्यांचे व्यवहार नोंदणीकृत करण्यासाठी अशांना दस्त नोंदणीसाठी प्रवृत्त करण्यात येईल.
अनोंदणीकृत दस्त नोंदणीसाठी मुद्रांक विभागात आल्यास त्यावर योग्य ते मुद्रांक आकारण्यात येईल.

दस्ताची नोंद करून आणि खरेदीदाराच्या नावाची नोंद घेण्यासाठी महसूल विभागाकडे फेरफारसाठी ऑनलाइन पाठविण्यात येईल.
खरेदीदारांच्या नोंदी अधिकार अभिलेखात विनाविलंब घेतल्या जातील.

Total Visitor Counter

3072973
Share This Article