GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पोलीस दलाचा ‘विराट’ हरपला;शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Gramin Varta
816 Views

रत्नागिरी: रत्नागिरी पोलीस दलाचा अत्यंत विश्वासू आणि धाडसी साथीदार असलेल्या ‘विराट’ या पोलीस श्वानाचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणाऱ्या एका कर्तबगार सहकाऱ्याच्या जाण्याने पोलीस दलाने आपला एक सच्चा साथीदार गमावला आहे. डॉबरमन जातीचा असलेला विराट २०१७ मध्ये पोलीस दलात दाखल झाला होता. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने दोन खून, एक अपहरण आणि दहा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांचा माग काढत पोलिसांना मोलाची साथ दिली होती. वासावरून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याची त्याची चपळाई आणि कुशाग्रपणा तपासासाठी नेहमीच मैलाचा दगड ठरला होता.

अशा या लाडक्या सहकाऱ्याला गुरुवारी बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या कार्यालय आवारात शासकीय इतमामाने अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी उपस्थित राहून विराटच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, राजेंद्र कुळसंगे, पोलीस उपनिरीक्षक शेगाबेन मावची, किरण घाग यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. आपल्या अनेक वर्षांच्या या इमानदार आणि धाडसी सहकाऱ्याला निरोप देताना उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. एका निष्ठावान योद्धाप्रमाणे सेवा बजावणाऱ्या विराटवर शासकीय सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

Total Visitor Counter

3309069
Share This Article