रत्नागिरी: शहरातील साखरतर मोहल्ला येथील रस्त्यांची दुरवस्था गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील रहिवाशांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवणे तर सोडाच, पायी चालणेही अवघड झाले आहे. विशेषतः, एलपीजी गॅस सिलेंडरची गाडी गावात येत नसल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वृद्ध आणि महिलांना दूरवर जाऊन स्वतःच्या जबाबदारीवर सिलेंडर न्यावे लागते.
या भागात मच्छीमार्केट असल्याने खराब रस्त्यांमुळे मासे घेऊन येणाऱ्या गाड्यांना आणि ग्राहकांनाही प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांत या रस्त्याची दोन ते तीन वेळा डागडुजी करण्यात आली, परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता पुन्हा खराब झाला आहे. यामुळे डागडुजीवर खर्च झालेला पैसा वाया गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेकदा तक्रारी करूनही यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक आणि व्यापारी करत आहेत. या गंभीर प्रश्नावर लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.