GRAMIN SEARCH BANNER

यंदा २१ डिसेंबरला वर्षातील सर्वात लहान दिवस राहणार

Gramin Varta
183 Views

मुंबई: वैज्ञानिक आणि खगोलीय घटनांबद्दल सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल आणि उत्सुकता असते. पृथ्वीवर प्रकाश पसरवणारा सूर्य वर्षातील एका दिवशी अत्यंत कमी वेळ दर्शन देत असतो.

या दिवशी पृथ्वीशी संबंधित अशी खगोलीय घटना घडत असते की, त्या दिवशी सूर्य लवकर मावळत असतो, त्यामुळे रात्र फार मोठी असते. यंदा २१ डिसेंबरला वर्षातील सर्वात लहान दिवस राहणार आहे. २१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहिल. या बिंदूला ‘विंटर सोल्स्टाईस’ असे म्हणतात. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. ‘सूर्य स्थिर आहे’ असा त्याचा अर्थ होतो. भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत जातो. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. २१ डिसेंबरचा दिवस हा १० तास ४७ मिनिटांचा राहिल. या दिवसात दरवर्षाला एक दिवसाचा फरक पडू शकतो. दिवस व रात्रीचा कालावधी कमीजास्त होणे आपण नेहमीच अनुभवत असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडत असते. व याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायन सुध्दा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकते. सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी २१ डिसेंबर या सर्वात लहान दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व या १० तास ४७ मिनीटांच्या सर्वात लहान दिवसाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने आणि हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी केले आहे. पृथ्वीवरील ऋतू सुध्दा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदन बिंदू आहेत. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘वसंत संपात बिंदू’ असे म्हणतात. तर त्याचे विरुद्ध बिंदूत २३ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘शरद संपात बिंदू’ असे म्हणतात. या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सूर्य असतांना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. या दिवसाला ‘हिवाळा अयन दिवस’ असे सुध्दा म्हणतात.

Total Visitor Counter

3368832
Share This Article