GRAMIN SEARCH BANNER

दापोली-केळशी बसचा पत्रा उडाला; प्रवाशांचा थरकाप, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Gramin Varta
204 Views

दापोली: दापोली आगारातून केळशीकडे मार्गस्थ झालेल्या एसटी बसच्या चालकाच्या केबिनवरील पत्रा बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक उडाल्याने बसमधील प्रवाशांची चांगलीच गाळण उडाली. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, पत्रा तुटून लांब फेकला न गेल्याने मोठी दुर्घटना टळली आणि सर्व प्रवासी सुरक्षित राहिले.

नियोजित मार्गावर बस धावत असताना अचानक चालकाच्या केबिनवरील दोन ते अडीच फूट लांबीचा पत्रा उडाला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने बस थांबवली. बसमध्ये यावेळी अनेक प्रवासी होते, ज्यांनी या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे धास्ती घेतली होती. या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी, यामुळे एसटी प्रशासनाच्या कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अशा निकृष्ट दर्जाच्या बसेस रस्त्यावर धावत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी व्यक्त केली. एसटी महामंडळाकडून बसची नियमित तपासणी आणि योग्य देखभाल केली जात नसल्याचा गंभीर आरोपही प्रवाशांकडून करण्यात आला आहे. सुरक्षित प्रवासाचा दावा करणाऱ्या प्रशासनाने अशा तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Total Visitor Counter

3375700
Share This Article