GRAMIN SEARCH BANNER

गोव्याऐवजी रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटकांची विक्रमी पसंती, ६० कोटींची उलाढाल

Gramin Varta
260 Views

रत्नागिरी, दापोली, गुहागर, गणपतीपुळे पर्यटनस्थळांवर गर्दी

रत्नागिरी : निसर्गाची मुक्त उधळण लाभलेल्या कोकण किनारपट्टीवर यंदाच्या २०२५ च्या पर्यटन हंगामात पर्यटकांचा अभूतपूर्व महापूर उसळला. सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांनी गोव्याऐवजी रत्नागिरी जिल्ह्याला पसंती दिल्याने संपूर्ण जिल्हा अक्षरशः ‘हाऊसफुल्ल’ झाला होता. या विक्रमी गर्दीमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली असून, सुमारे ६० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा रत्नागिरी, दापोली, गुहागर, गणपतीपुळे आदी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली दिसून आली. स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गरम्य वातावरण आणि तुलनेने शांत पर्यटन अनुभव यामुळे कोकण पर्यटकांचा पहिला पसंतीक्रम ठरल्याचे चित्र आहे.

पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना

यंदा कांदळवन (मॅंग्रोव्ह) सफारी, खाडी सफारी आणि कयाकिंग या उपक्रमांना मोठी मागणी होती. नाचणे–नारायणमळी परिसरातील खाडीसफारीला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने पर्यावरणपूरक पर्यटनाला नवी दिशा मिळाली आहे. पर्यटनाचा वाटा आता जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि मासेमारीइतकाच महत्त्वाचा ठरू लागला आहे.

ग्रामीण भागालाही लाभ

यंदा महाराष्ट्रासह कर्नाटक व गुजरात राज्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक खासगी वाहने व बसने दाखल झाले. विशेष म्हणजे, महागड्या रिसॉर्ट्सपेक्षा स्थानिक ‘होम स्टे’ आणि ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ योजनांना मध्यमवर्गीय पर्यटकांनी अधिक पसंती दिली. यामुळे पर्यटनाचा पैसा थेट ग्रामीण घराघरात पोहोचला असून स्थानिकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

बाजारपेठांना सुगीचे दिवस

पर्यटनाच्या या लाटेचा सर्वाधिक फायदा स्थानिक बाजारपेठांना झाला. कोकणी मेवा, स्थानिक खाद्यपदार्थ आणि हस्तकला वस्तूंच्या विक्रीत यंदा दुप्पट वाढ झाली. हर्णे व मिरकरवाडा बंदर परिसरात मासळी खरेदीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. मासळी विक्रेत्यांच्या मते, दररोज ३ ते ५ लाख रुपयांची उलाढाल केवळ मासळी बाजारात झाली. याशिवाय हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक, पर्यटन मार्गदर्शक आणि बोटसफारी चालकांच्या उत्पन्नातही मोठी भर पडली.

पायाभूत सुविधांकडे लक्ष आवश्यक

वाढत्या गर्दीमुळे काही अडचणीही समोर आल्या. वाहतूक कोंडी, अपुरी निवास व्यवस्था आणि पार्किंगच्या समस्यांमुळे काही ठिकाणी पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. भविष्यात पर्यटनातून होणारी ही उलाढाल कायम ठेवायची असेल, तर रस्ते, पार्किंग, स्वच्छता व मूलभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास करणे अत्यावश्यक असल्याची अपेक्षा स्थानिक व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3205342
Share This Article