GRAMIN SEARCH BANNER

चांदोर येथील रेशन धान्य घोटाळा चव्हाट्यावर; संतापलेल्या शेकडो महिलांचा जिल्हा पुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा

रत्नागिरी: तालुक्यातील चांदोर गावातील रेशन वितरण व्यवस्थेचा सावळा गोंधळ आता थेट जिल्हा प्रशासनाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हक्काचे धान्य मिळत नसल्याने संतापलेल्या चांदोरमधील शेकडो महिलांनी मंगळवारी रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात धाव घेत आपला तीव्र संताप व्यक्त केला. रेशन दुकानात धान्य येते, मात्र ते जाते कुठे आणि एकाच दिवसात कसे संपते, असा संतप्त सवाल या महिलांनी यावेळी प्रशासनाला विचारला.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, चांदोर येथील रेशन दुकानाबाबत ग्रामस्थांच्या सततच्या तक्रारींची दखल घेत २७ मार्च रोजी सायंकाळी पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानाची आकस्मिक तपासणी केली होती. या तपासणीत अन्नधान्य वितरणात मोठी तफावत आणि गंभीर दोष आढळून आले होते. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा कार्यालयात मंगळवारी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीसाठी सरपंच पूनम मेस्त्री, उपसरपंच सूर्यकांत तांबे, संजीवनी घडशी आणि ग्रामपंचायत सदस्यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, रेशन दुकानदार संदीप तोडणकर या सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये अधिकच रोष निर्माण झाला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अनेक ग्रामस्थांचे बायोमॅट्रिक थम्ब (अंगठ्याचे ठसे) घेऊनही त्यांना प्रत्यक्षात धान्य दिले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, रेशन कार्डवर नोंदी होतात किंवा थम्ब घेतले जातात, पण हातात धान्य पडत नाही. यावर जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, जोपर्यंत धान्य हातात मिळत नाही, तोपर्यंत बायोमॅट्रिक थम्ब देऊ नका, असे स्पष्ट निर्देश दिले. थम्ब देण्याचा अर्थ तुम्ही धान्य घेतले असा होतो, त्यामुळे या तांत्रिक बाबीचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कोणाला किती महिने धान्य मिळाले नाही याची सविस्तर नोंद घेण्यास सुरुवात केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. सरपंच पूनम मेस्त्री आणि उपसरपंच सूर्यकांत तांबे यांनी ग्रामस्थांच्या वतीने या लढ्याचे नेतृत्व केले. भर उन्हात रेशन कार्ड हातात घेऊन न्यायासाठी आलेल्या या महिलांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर काही काळ दणाणून गेला होता. आता या प्रकरणातील दोषींवर प्रशासन काय पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3309347
Share This Article