GRAMIN SEARCH BANNER

खेड : लवेल माणी फाटा येथे गांजा ओढणाऱ्या दोन मजुरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

Gramin Varta
102 Views

खेड: तालुक्यातील लवेल माणी फाटा येथे रस्त्याच्या कडेला उघडपणे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांना खेड पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. हे दोन्ही संशयित व्यवसायाने मजूर असून, त्यांच्याकडून गांजा ओढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत खेड पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास लवेल माणी फाटा परिसरात काही जण गांजाचे सेवन करत असल्याची विश्वसनीय माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस अंमलदार सोहेल ढगे आणि चालक पोलीस शिपाई पवार (बकल नंबर ८९७) यांनी तातडीने लवेल माणी फाटा येथे जाऊन सापळा रचला.
यावेळी पोलिसांना रस्त्याच्या कडेला दोन तरुण हातामध्ये सिगारेट घेऊन ती ओढताना दिसले. त्यांच्या समोरच जमिनीवर एक अर्धी भरलेली काडेपेटी आणि चार ते पाच विझलेल्या माचीसच्या काड्या पडलेल्या होत्या. संशयितांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पंचांसमक्ष ‘तुम्ही काय ओढत आहात?’ अशी चौकशी केली. त्यावर या दोन्ही तरुणांनी आपण गांजा पीत असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी आपली नावे प्रीतम राजेंद्र कदम (वय २५, रा. माणी देऊळवाडी, ता. खेड) आणि चेतन राजन हरधारे (वय ३६, मूळ रा. चिपळूण मार्कंडी, सध्या रा. लवेल पेट्रोल पंपाजवळ, ता. खेड) अशी असल्याचे सांगितले. हे दोघेही मजूर म्हणून काम करतात.

उघडपणे अंमली पदार्थाचे सेवन करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सोहेल इकबाल ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून २०२६ रोजी दुपारी २.४७ वाजता संशयित प्रीतम कदम आणि चेतन हरधारे यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५  चे कलम ८(क) आणि २७ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा पुढील अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3483537
Share This Article