GRAMIN SEARCH BANNER

‘एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’तर्फे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा सन्मान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे रक्तदानाच्या महायज्ञाची विक्रमी नोंद

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान ठेवत भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांनी दोन विश्व विक्रम प्रस्थापित केले.

या महारक्तदान उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून त्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सन्मानित केले . एका दिवसात पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील सर्व १२२१ मंडलांमध्ये सर्वाधिक १०८८ रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा आणि सर्वाधिक ७८ हजार ३१३ युनिट्स रक्ताचे संकलन, असे दोन विश्वविक्रम केल्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी श्री. चव्हाण यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.

प्रदेश भाजपा आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी न्यासाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे वरिष्ठ परीक्षक संजय भोला, वरिष्ठ परिक्षक सीमा मन्नीकोट यांच्या हस्ते श्री. चव्हाण यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, राजेश पांडे , विजय चौधरी , मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी एकाच दिवशी झालेल्या महारक्तदान उपक्रमाने दोन जागतिक विक्रम केले ही पक्षासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. सातत्याने समाजासाठी काम करण्याच्या पक्ष संघटनेच्या शिकवणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अव्याहतपणे कार्य करत आहेत त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्याची संधी या शिबिरामुळे सर्वांना मिळाली .रक्तदात्यांनीही सामाजिक जाणीवा जागृत ठेवत रक्तदानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना समर्पण भावाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल श्री. चव्हाण यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.संघटित शक्तीमुळेच रक्तदानाच्या या महायज्ञाने दोन विक्रमांना गवसणी घातली या शब्दांत कौतुक करत श्री. चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी , प्रदेश कार्यलायातील कर्मचारी यांच्या योगदानाची दखल घेतली. पक्षकार्यकर्त्यांचे हे यश असून मी भाजपा प्रदेशाध्यक्ष या नात्याने प्रतिनिधी म्हणून प्रशस्तीपत्राचा स्विकार केला असेही त्यांनी नमूद केले.

Total Visitor Counter

2455558
Share This Article