संगमेश्वर/दिनेश आंब्रे: शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात दीर्घ काळ कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप पेटवणारे, श्री संजय श्रीराम मुळ्ये (माजी मुख्याध्यापक) व श्री विजय शिवराम चव्हाण (ज्येष्ठ शिक्षक) या दोन मान्यवर शिक्षकांचा सेवापूर्ती समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.
कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. नंतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, ईशस्तवन गायन व स्वागत गीत सादर करण्यात आले. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना दोन्ही सरांचे गुणगान केले. सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.
शाळेतील सहकारी शिक्षकांनी आपल्या सहवासातील आठवणी सांगताना, शिक्षक म्हणून त्यांचा मोठेपणा अधोरेखित केला. वरखेडा हायस्कूलचे अरुण मुळे सर म्हणाले, ” धाडसी मनुष्य कधी भीत नाही, भिणारा धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय कार्य करता येत नाही.”
मुख्याध्यापक प्रभावळकर सर यांनी संजय सरांबद्दल बोलताना, “ते आमचे प्रेमळ प्रतिस्पर्धी होते, आणि स्पर्धा करावी तर कोळंबे हायस्कूलशी ” असे नमूद केले.
सोनाली मुळे यांनी आपल्या भावनिक मनोगतात म्हटले, “संजय सरांना कधी निवांत बसलेले पाहिले नाही; ते सतत शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी झटत राहिले.”
कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदेश जोशी, संस्था अध्यक्ष नयन मुळ्ये, सचिव राजाभाऊ मुळ्ये, आणि मुख्याध्यापक रवींद्र मुळ्ये सर यांच्या उपस्थितीत दोन्ही सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
श्री विजय चव्हाण सरांनी, “मी जो काही आहे, तो संस्थेमुळेच आहे. संस्थेला वेळ, मदत आणि मनापासून प्रेम देण्याचे वचन देतो,” असे सांगितले.
संजय मुळे सरांनी, आपल्या विज्ञान विषयातील अध्यापनातील वाटचालीविषयी सांगताना सहकाऱ्यांचे आभार मानले. “संस्थेच्या पाठींब्यामुळेच मी विविध उपक्रम राबवू शकलो,” असे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे सचिव राजाभाऊ मुळ्ये म्हणाले, “अडचणींचे संधीमध्ये रूपांतर कसे करावे हे या दोघांनी दाखवून दिले. शाळेसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे.”
अध्यक्ष नयन मुळे सरांनी सांगितले की, “या दोघांनी विद्यार्थ्यांवर अपार मेहनत घेतली.आमच्या शाळेचे शिक्षक चांगले काम करतात.”
या कार्यक्रमासाठी कुरधुंडा केंद्रप्रमुख नाचणकर मॅडम, कोळंबे, कुरधुंडा व कोंडगाव हायस्कूलचे शिक्षकवृंद, पूर्वीचे शिक्षक ए. एन. जोशी सर, चिपळूण अर्बन बँकेचे शाखा प्रमुख श्री. हेमंत बंडखळे सर, तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर कांबळे सरांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा समारंभ केवळ शिक्षकांच्या सेवेला मान्यता देणारा नव्हता, तर शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नात्याचे गहिरे सूर व्यक्त करणारा अविस्मरणीय क्षण होता.
कोळंबे विद्यालयात दोन शिक्षकांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न
