रत्नागिरी :- गांजा हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने बुधवार ३० जुलै रोजी रात्री ८.२५ वाजताच्या सुमारास भाट्ये परिसरातील कोहिनूर हॉटेलच्या कंपाउंड लगत असलेल्या टेबल पॉईंट येथून अटक केली. त्यांच्याकडून १७ ग्रॅम गांजा आणि टोयोटा फॉरच्युनर कार असा एकूण ५ लाख ३ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमान नौशाद शेकासन ( २६ , रा. राहत अपार्टमेंट, रत्नागिरी), राज नितीन राउत (२५ , रा. संस्कृती गार्डन शिवाजीनगर, रत्नागिरी), कैफ नियाज होडेकर ( २१ , रा. अली मंजील भाट्ये, रत्नागिरी), दानिश मेहबूब मुल्ला ( २२ , रा. शंखेश्वर समुह आरोग्य मंदिर, रत्नागिरी) आणि मुसद्दीक मुबीन म्हसकर ( २२ , रा. सायमा मंजिल कर्ला, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत.
हे पाचही संशयित बुधवारी रात्री आपल्या ताब्यात १७ ग्रॅम गांजा बाळगून टोयोटा कार (एमएच-०४-ईएक्स-२५८८ ) मध्ये बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखेचे रत्नागिरी येथील पोलिस उपनिरीक्षक समीर मोरे, सहाय्यक पोलिस फौजदार सुशील कदम, पोलिस हेड काँस्टेबल महेश गुरव, ललित देउसकर, आशिष शेलार, योगेश तेंडूलकर, संतोष कोळेकर, पोलिस नाईक रत्नकांत शिंदे, चालक पोलिस हेड कांस्टेबल अमोल कांबळे, यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधिक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.