GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: असुर्डे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

Gramin Varta
347 Views

अज्ञातावर वनविभागाने केला गुन्हा दाखल

संगमेश्वर– येथील असुर्डे गावात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे ५ ते ६ महिन्यांचा बिबट्याचा बछडा मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी असुर्डे येथील पोलीस पाटील श्री. सुभाष गुरव यांनी वनविभागाला दूरध्वनी करून असुर्डे-चाळकेवाडी रस्त्यावर ढोलेवाडीजवळ एक बिबट्या मृत अवस्थेत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. प्रकाश सुतार यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता, रस्त्याच्या कडेला बिबट्याचा एक बछडा निपचित पडलेला आढळून आला.

वनविभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीत, हा बछडा नर जातीचा असून, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, कडवई येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. बेलूरे यांनी मृत बछड्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर, मृत बछड्याला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आले.

विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी वनपाल श्री. सागर गोसावी, वनरक्षक श्री. आकाश कडूकर, श्री. सहयोग कराडे, श्री. सूरज तेली, श्रीमती सुप्रिया काळे, तसेच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, पोलीस पाटील श्री. सुभाष गुरव आणि वन्यप्राणी मित्र श्री. दिनेश गुरव यांनी सहकार्य केले.

दरम्यान, वन्यप्राणी रस्त्यावरून जाताना अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे वन्यजीव धोक्यात आले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी सतर्क राहून मर्यादित वेगात वाहने चालवण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.
विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर अशा प्रकारची घटना घडली किंवा कोणताही वन्यप्राणी अडचणीत सापडलेला आढळल्यास, तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Total Visitor Counter

3205040
Share This Article