रत्नागिरी: गाडी बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथे घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीसह त्याच्या कुटुंबालाही मारहाण करण्यात आली असून, पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता घडली.
या प्रकरणी विनोद प्रमोद आंब्रे (वय ५०, रा. तेलीवाडी, चांदेराई) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदेराई बाजारातून घरी परत येत असताना, आरोपी समीर सुरेश आंब्रे याने आपला रिक्षा रस्त्यात आडवा लावला होता. आंब्रे यांनी हॉर्न वाजवून रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली.
यावेळी आवाज ऐकून विनोद आंब्रे यांची आई द्रोपदी अंगणात आली. तिने विचारणा केली असता, समीरने जुन्या जमिनीच्या वादावरून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. आपल्या आईला सोडवण्यासाठी विनोद गेले असता, आरोपी अमित सुरेश आंब्रे याने हातातील लाकडी दांड्याने त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मारले. यात त्यांच्या डोळ्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली. विनोद खाली पडल्याने त्यांच्या डोक्यालाही मार लागला.
या हाणामारीत विनोद यांची पत्नी आणि मुलगी भांडण सोडवण्यासाठी आल्या असता, आरोपींनी त्यांनाही हाताने मारहाण करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर विनोद यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तिन्ही आरोपींवर भा.दं.वि. कलम ११८(२), ३५२, ३५१(१), ३(५) नुसार गु.र.नं. १७०/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
रत्नागिरी : चांदेराई येथे क्षुल्लक वादातून हाणामारी; तिघांविरोधात गुन्हा दाखल
