संगमेश्वर : तालुक्यातील तेरे गेल्येवाडी येथील २५ वर्षीय प्रशांत नारायण गेल्ये याचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.४५ वाजता कणकवली येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२५ रोजी प्रशांत संगमेश्वर बाजारात गेला असताना त्याने कोणत्यातरी अज्ञात विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने कसबा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये हलवले. परंतु, उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला कणकवली, सिंधुदुर्ग येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असतानाच १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.४५ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेने गेल्ये कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
संगमेश्वर गेल्येवाडी येथील 25 वर्षीय तरुणाची विष पिऊन आत्महत्या
