समीर शिगवण / रत्नागिरी
नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU) येथे झालेल्या पदवीदान समारंभात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती इंदुमती मलुष्टे यांना देशभरात पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल गौरविण्यात आले. ग्राहक कायद्यातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात (Post Graduate Diploma in Consumer Law and Practice) त्यांनी हे यश मिळवले आहे.
रविवार, 7 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या या सोहळ्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. सूर्यकांत यांच्या हस्ते त्यांना प्रावीण्य आणि पदविका प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी सर्वोच्च न्यायालय व कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, तसेच कायदा विद्यापीठातील मान्यवर उपस्थित होते.
या एका वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमात देशभरातील वकील, न्यायाधीश, प्रशासकीय व पोलीस सेवेतील अधिकारी, तसेच विविध सरकारी–खाजगी कंपन्यांतील विधी अधिकारी सहभागी झाले होते. कठीण अशा तीन परीक्षांमध्ये अव्वल ठरत त्यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले आहे.
इंदुमती मलुष्टे यांच्या या कामगिरीमुळे सिंधुदुर्ग–रत्नागिरी जिल्ह्याच्या न्यायव्यवस्थेला नवे बळ मिळेल, अशी भावना वकील आणि ग्राहक वर्गातून व्यक्त केली जात असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.