देवरूख:शालेय जीवनातच ‘दे दान सोडे गाल’ या उक्तीनुसार आपल्याकडे असलेल्यापैकी काही भाग गरजूंना दान करण्याची उदात्त भावना देवरूख येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी श्रेया कृष्णा मेस्री हिने प्रत्यक्षात उतरवली आहे. केवळ वाढदिवस साजरा करून तिने न थांबता, तिला शिष्यवृत्ती म्हणून मिळालेली तब्बल ७ हजार रुपयांची रक्कम तिने देवरूख मातृमंदिर बालिकाश्रमातील मुलींच्या शिक्षणासाठी देऊन दातृत्वाचा एक नवा आयाम आणि आदर्श निर्माण केला आहे.
शिक्षक कृष्णा मेस्री यांची कन्या असलेल्या श्रेयाला दातृत्वाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. आपला वाढदिवस आनंदात साजरा करताना त्या आनंदाचा काही भाग सामाजिक बांधिलकी म्हणून इतरांनाही मिळावा या भावनेतून तिने देवरूख मातृमंदिर बालिकाश्रमातील मुलींसोबत आपला वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे तिने बालिकाश्रमातील मुलींसोबत वाढदिवस साजरा केला आणि त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले.
यावेळी सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे, श्रेयाला शिष्यवृत्ती म्हणून मिळालेल्या ७ हजार रुपयांचा धनादेश तिने या बालिकाश्रमातील मुलींच्या शिक्षणासाठी अधिक्षिका कुवर यांच्याकडे सुपूर्द केला. अत्यंत लहान वयात मिळालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम स्वतःसाठी न वापरता, इतरांच्या भविष्यासाठी दान करण्याचा श्रेयाचा हा निर्णय निश्चितच प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. तिच्या या कार्यामुळे समाजात दातृत्वाचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
श्रेयाच्या या स्तुत्य उपक्रमावेळी तिचे पालक कृष्णा मेस्री, कस्तुरी मेस्री यांच्यासह मुख्याध्यापक मधुकर कोकणी, युयुत्सु आर्ते, वैभव कदम, दिलीप महाडीक सर, महावीर कांबळे, क्षीरसागर, सावंत, वाघमोडे, दिंगबर मांडवकर, राजेश मोगरवणकर, बाळकृष्ण सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. श्रेयाच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.