खेड, (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोसते घाटात एक धक्कादायक घटना समोर आली. महामार्गावर डांबर सांडल्यामुळे रस्ता निसरडा होऊन अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले. या घटनेमुळे महामार्गावर सुरू असलेल्या डांबराच्या बेजबाबदार वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डांबर घेऊन जाणाऱ्या एका ट्रकमधील बॅरलमधून मोठ्या प्रमाणात डांबर रस्त्यावर सांडले होते. यामुळे रस्ता अत्यंत निसरडा बनला. याच मार्गावरून जाणाऱ्या काही दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडले आणि ते थेट रस्त्यावर आपटले. या अपघातात काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या अंगावर आणि कपड्यांवर डांबर लागल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे महामार्गावर डांबराची वाहतूक करताना सुरक्षिततेच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे आणि संबंधित यंत्रणांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागरिकांकडून या बेजबाबदारपणामुळे सामान्य लोकांचे जीव धोक्यात येत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.