GRAMIN SEARCH BANNER

राजापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या  वृद्धाला जन्मठेप

Gramin Varta
13 Views

राजापूर : तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या वृद्धाला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या अत्याचारामुळे ती 12 आठवड्यांची गर्भवती राहिली होती.

वासुदेव अर्जुन गुरव ऊर्फ वासू बाबा (77, रा. राजापूर झर्ये सुतारवाडी, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी वासुदेव गुरवने 7 ऑक्टोबर 2022 रोजी पीडिता ही घरात एकटीच असताना तिच्या घरात घुसून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोणालाही काही सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबर 2022 रोजीही पीडितेवर त्याने अशीच धमकी देत अत्याचार केला. त्याच्या धमकीला घाबरून तिने याबाबत कोणालाही काही सांगितले नव्हते. दरम्यान, डिसेंबर 2022च्या शेवटच्या आठवड्यात पीडिता ही घराबाजूच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असताना आरोपीने तिला आपण थर्टी फर्स्ट कधी करूया असे विचारले. या सर्व अत्याचाराला कंटाळून अखेर पीडितेने सर्व हकीकत आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर पीडितेने 30 जानेवारी 2023 रोजी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात भा.दं.वि. कायदा कलम 376(3),506 आणि पोक्सो कायद्यांतर्गत 4,6,8 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मधुकर मौले यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी 17 साक्षिदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा दंड पीडितेला देण्यात येणार आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार विकास खांदारे यांनी काम पाहिले.

Total Visitor Counter

2649063
Share This Article