लांजा : कोकणातील लांजा येथील सुपुत्र आणि भेदिक शाहिरीचे निष्ठावंत शिलेदार शाहीर तुषार मधुकर पंदेरे यांना “प्रा. डॉ. आनंद गिरी तुराभूषण पुरस्कार – २०२५” जाहीर झाला असून, त्यांच्या शाहिरी कारकिर्दीतील हा महत्त्वाचा सन्मान मानला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पन्हाळा येथील पर्णाल इतिहास संशोधन मंडळ आणि मुलुखगिरी प्रकाशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १३ जुलै २०२५ रोजी किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर येथे “लोकसंस्कृतीचा आनंदयात्री कृतज्ञता सोहळा – पर्व २” या कार्यक्रमात विविध लोककलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात लोकसंस्कृती अभ्यासक प्रा. डॉ. आनंद गिरी यांच्या गौरवार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची यंदाची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये जीवनगौरव पुरस्कार – २०२५ मा. श्री. अंकुश तेलंगे (गिर्यारोहक, कोल्हापूर), कलगीसम्राट पुरस्कार – २०२५ शाहीर विठ्ठल पाटील (मांडूकली, गगनबावडा), लोककलाभूषण पुरस्कार – २०२५ शाहीर संपत कदम (तुंग, सांगली), जीवनगौरव पुरस्कार – २०२५ शाहीर पंढरीनाथ मोरे (बीडकर महाराज), तुराभूषण पुरस्कार – २०२५ शाहीर तुषार पंदेरे (लांजा, रत्नागिरी), शाहीर पंडित पुरस्कार – २०२५ शाहीर संजय गुरव (कोल्हापूर) आणि शाहीर शिवाजीराव शिंदे (अहिल्यानगर), शाहीरी गौरव पुरस्कार – २०२५ शाहीर सोमाजी वाघ (मिणचे, हातकणंगले) आणि शाहीर बाळासो खांडेकर (बीड, करवीर) यांचा समावेश आहे.
या गौरवाबद्दल शाहीर तुषार पंदेरे यांनी आपल्या गुरुवर्य, वस्ताद, कलामित्र, रसिक प्रेक्षक, कलगी-तुरा मंडळे व शाहिरी प्रेमी यांचे आभार मानले आहेत. ३२ वर्षांच्या आपल्या शाहिरी प्रवासातील हा दुसरा पुरस्कार असून, याआधी त्यांना महाराष्ट्र कलगी-तुरा उन्नती मंडळ, मुंबई यांच्याकडून “कलगी-तुरा शाहिरी भूषण पुरस्कार” मिळाला होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ. डॉ. विनयरावजी कोरे (पन्हाळा-शाहूवाडी) असणार असून, अध्यक्षस्थानी अदि. रामचंद्र (प्रसिद्ध सिने व नाट्य संगीत दिग्दर्शक, पुणे) असतील. यावेळी शिल्पकार सतीश घारगे (कोल्हापूर), विश्वास (भाऊ) पाटील (अध्यक्ष – सुरभी संघटना, आपटी), प्रा. डॉ. चंदा सोनकर (प्राध्यापक व अनुवादक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. शिवप्रसाद शेवाळे (अध्यक्ष – प. इ. स. मंडळ, पन्हाळा), श्री. आशिष पाटील (युवा नेते, पन्हाळा), सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण, तसेच संयोजक अमित देसाई, मृणाली शेटे, रणजीत शिपुगडे, ऋतुराज काशिद, स्वप्नील पाटील यांचे विशेष योगदान आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गायक आणि निवेदक प्रल्हाद पाटील करणार आहेत.
कोकणातील शाहीर तुषार पंदेरे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कलगी-तुरा शाहीर, नमन मंडळ, विविध सांस्कृतिक संस्था, मुंबई व ग्रामीण भागातील मंडळे आणि कलारसिकांनी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील लोककलेच्या क्षेत्रातील एक प्रेरणादायी पर्व ठरणार आहे.
शाहीर तुषार पंदेरे यांना “प्रा. डॉ. आनंद गिरी तुराभूषण पुरस्कार –२०२५” जाहीर
