मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १ ते ६ जुलै या कालावधीत महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढणार असून, कोकणसह घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणातून जाणारी मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणी रेषा यामुळे राज्यात पावसाचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे. हवामान विभागाने कोकणात २ ते ४ जुलै दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर २ आणि ३ जुलै रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, ४ ते ६ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पावसाचा व्यापक विस्तार अपेक्षित असून, मराठवाड्यात २ आणि ३ जुलैला पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
या काळात मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे. अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचणे, शहरी भागांत रस्ते जलमय होणे तसेच घाटरस्त्यांवर भूस्खलनाचा धोका संभवतो, त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी स्थानिक हवामान आणि वाहतुकीची माहिती घ्यावी. खराब हवामानामुळे अरबी समुद्रात जाण्यास मच्छीमारांना सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देत भात व भाजीपाला पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा वेळेवर निचरा करावा आणि जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे, अशा सूचना दिल्या आहेत.
