खेड– मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीनजीक आज सकाळी खासगी आराम बस आणि इको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या एका इको कारला (एमएच ०३/सीएस ९७१३) पाठीमागून येणाऱ्या भरधाव खासगी आराम बसने (एमएच १५/झेडब्ल्यू ९९७७) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, इको कारच्या पाठीमागील भागाचा चक्काचूर झाला.
या अपघातात इको कारमधील अजय महादेव पाडेकर (वय ३२, रा. नातूनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या आदिती अजय पाडेकर (वय २८) आणि मंजुळा महादेव पाडेकर (वय ६०) या दोघीही जखमी झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते सूरज हंबीर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताचा पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत खासगी आराम बस चालकावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.