GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत मच्छीमार बोटीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, बोलेरोही जळून खाक

रत्नागिरी: राजीवडा येथील किनाऱ्यावर उभ्या असलेल्या एका मच्छीमार बोटीला आज (शुक्रवार, २२ जून) दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या भीषण आगीत बोट पूर्णपणे जळून खाक झाली, तर तिच्याजवळ उभा असलेला एक टेम्पोही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मच्छीमार बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसीफ वस्ता आणि मुजफ्फर वस्ता (राजीवडा) यांच्या मालकीची ही मच्छीमार बोट होती. सध्या पावसाळ्यामुळे मच्छीमारी बंद असल्याने वस्ता यांनी आपली बोट राजीवडा किनाऱ्यावर सुरक्षितपणे लावून ठेवली होती. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बोटीला अचानक आग लागली. सुरुवातीला आग लहान असली तरी, वाऱ्यामुळे आणि बोटीतील ज्वलनशील पदार्थांमुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे मोठे लोळ आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने शहर पोलीस ठाणे आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच, रत्नागिरी नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आग विझवण्याचे काम सुरू केले. आगीची तीव्रता इतकी होती की, बोटीला लागून उभ्या असलेल्या एका टेम्पोनेही पेट घेतला. सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत बोट आणि टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाले होते.

या आगीमुळे नेमके किती नुकसान झाले, याचा आकडा अद्याप निश्चित नसला तरी, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील अधिकारी महेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली फायरमन नरेश मोहिते, शिवम शिवलकर, अमोल चवेकर, परेश सावंत, अनिश तोडणकर, वाहनचालक सलीम चंदावाले आणि संकेत पिलणकर यांनी आग विझवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे मच्छीमार बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Total Visitor Counter

2475145
Share This Article