अणुऊर्जा प्रकल्पांविरोधात कोकणची वज्रमूठ; पूर्णगड, बारसू आणि देवगडमधील ग्रामस्थांकडून ‘कोकण अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघा’ची स्थापना

Gramin Varta
1661 Views

राजापूर: कोकण किनारपट्टीवर प्रस्तावित असलेल्या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शवण्यासाठी पुर्णगड, बारसू आणि देवगड परिसरातील हजारो ग्रामस्थ आता एकत्र आले आहेत. राजापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘शाश्वत कोकण परिषदे’च्या सभेत या प्रकल्पांविरुद्ध अधिकृतपणे रणशिंग फुंकण्यात आले असून, सर्व गावांतील शेतकरी, मच्छिमार आणि चाकरमान्यांच्या एकजुटीतून ‘कोकण अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघा’ची स्थापना करण्यात आली आहे. जैतापूर प्रकल्पानंतर आता पुन्हा एकदा कोकणात अणुऊर्जा प्रकल्पांविरोधात संघर्षाची ठिणगी पडली आहे.

राजापूर, बारसू, नाणार, देवगड, पूर्णगड, शिवणे खुर्द आणि आडेवरे यांसह एकूण २३ हून अधिक गावांतील ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या सभेला पर्यावरणाचे अभ्यासक सौम्या दत्ता, डॉ. मंगेश सावंत, सत्यजित चव्हाण आणि रानमाणूस प्रसाद गावडे यांसारख्या तज्ज्ञांनी उपस्थिती लावून ग्रामस्थांना प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी मार्गदर्शन केले. अणुऊर्जा प्रकल्पांमुळे निसर्ग, पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत ग्रामस्थांनी सभेदरम्यान तीव्र चिंता व्यक्त केली आणि प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
या संघाची स्थापना झाल्यामुळे आता विविध भागांत विखुरलेला हा विरोध एका छताखाली आला आहे. कोकणच्या शाश्वत विकासासाठी हे प्रकल्प घातक असल्याचे सांगत, ग्रामस्थांनी आता आपल्या जमिनी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी निर्णायक लढा देण्याची तयारी दर्शवली आहे. आगामी काळात या संघर्षाचे स्वरूप अधिक व्यापक होण्याची चिन्हे असून, प्रशासनावर दबाव वाढवण्यासाठी विविध स्तरांवर आंदोलने केली जाणार आहेत. या नव्या संघटनेच्या स्थापनेमुळे पुन्हा एकदा कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4832980
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *