संगमेश्वर : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने घेतलेल्या भव्य विजयाच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापन निर्विघ्न पार पडले असले, तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वीच संगमेश्वरात राजकीय थर्मामीटर वाढलेले दिसते.
दिवाळीच्या उत्सवी पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना नवा वेग मिळत असून, शुभेच्छा बॅनर्सच्या माध्यमातून उमेदवार आपली उपस्थिती ठळकपणे जाणवू लागले आहेत. परंपरागत “शुभ दीपावली”वरून पुढे जात — “चेहरा नवा, बदल हवा”, “जनतेचा नेता, गावाचा विकासकर्ता”, “नव्या दमाचा निर्णय” अशा टॅगलाइन असलेले हटके बॅनर्स गावोगावी झळकू लागले आहेत.
या बॅनर्समुळे ग्रामपातळीपासून तालुक्यापर्यंत चर्चा रंगली आहे. कुणी या बॅनर्सना आगामी निवडणुकीची झलक म्हणत आहे, तर कुणी “हीच पहिली घोषणा मोहीम!” असे म्हणत आहे. काही बॅनर्स इतके प्रभावी आहेत की त्यावरून कोण उमेदवार म्हणून तयारीत आहे, हे तर्क नागरिकांनी आधीच बांधायला सुरुवात केली आहे.
निवडणुका जरी अजून अधिकृतपणे घोषित झालेल्या नसल्या तरी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि बॅनरबाजीमधून उमटणारी राजकीय महत्त्वाकांक्षा संगमेश्वरातील सत्तेचा खेळ अधिकच रंगवते आहे.
आता प्रश्न एवढाच — या शुभेच्छांमधून झिरपणारा राजकीय संदेश मतदारांच्या मनात किती ठसा उमटवतो? आणि निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू होईपर्यंत ही “बॅनरबाजी” किती वेग घेते?
संगमेश्वरात बॅनरबाजीचा रंग, कुणाचा होणार भंग?
