GRAMIN SEARCH BANNER

जि. प. प्राथमिक शाळा भावेआडोम तांबेवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!

Gramin Search
10 Views

रत्नागिरी:आज रत्नागिरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा भावेआडोम तांबेवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत दांडेआडोम-भावेआडोमचे सरपंच, मा. श्री कैलासजी तांबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जयवंत तांबे, बहुसंख्य पालक आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेच्या प्रवेशोत्सवासाठी परिसर आधीच स्वच्छ करून आकर्षकपणे सजवण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरात काढलेल्या प्रभातफेरीने झाली. नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह शाळेत येताच पुष्पवृष्टी करून आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शाळेत पहिल्यांदा पाऊल टाकणाऱ्या या चिमुकल्यांच्या पावलांचे ठसे घेऊन हा क्षण अविस्मरणीय करण्यात आला. उपस्थित महिलांनी नवागतांचे औक्षण केले आणि त्यांना गोड खाऊ देण्यात आला.

कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. या प्रवेशोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे तयार करण्यात आलेला आकर्षक सेल्फी पॉइंट, जिथे विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या आठवणी टिपल्या.

दुपारच्या भोजनात गोड पदार्थांचा समावेश होता, ज्यामुळे कार्यक्रमाची गोडी आणखी वाढली. आजच्या दिवसाचे औचित्य साधून श्री राजेश सनगरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वह्या भेट म्हणून दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शाळेतील शिक्षक श्री विजय शितप आणि श्री सुहास पवार यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

Total Visitor Counter

2647029
Share This Article