GRAMIN SEARCH BANNER

राजापूरचं नाट्यगृह सांस्कृतिक कार्यक्रमांपेक्षा इतर कार्यक्रमांसाठी वापरले जात असल्याने खंत

राजापूर : राजापूर शहराची सांस्कृतिक ओळख आणि नाट्य परंपरेचा समृद्ध वारसा असताना देखील येथील सुसज्ज नाट्यगृह सध्या पडद्याआड गेला असून, याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. अनेक वर्षांपूर्वी रसिक प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने राजापूरमध्ये अत्याधुनिक नाट्यगृहाची उभारणी केली. मात्र, आज हे नाट्यगृह सांस्कृतिक कार्यक्रमांपेक्षा इतर कार्यक्रमांसाठी वापरले जात असल्याची खंत स्थानिक नाट्यरसिक व्यक्त करत आहेत.

राजापूर ही भूमी मराठी रंगभूमीला लाभलेलं एक रत्न आहे. सुप्रसिद्ध नटवर्य डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जन्म याच मातीचा. तसेच सविता मालपेकर, वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्यासारख्या कलाकारांनीही या भूमीचे नाव उंचावले. याच ठिकाणी उन्हाळी काळात होत असलेले नाट्यप्रयोग गावागावांतील प्रेक्षकांना आकर्षून घेत असत. अनेक दिग्गज कलाकार राजापूरच्या रंगमंचावर अवतरले होते.

या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी नाट्यगृह असावे, या हेतूने तत्कालीन खासदार सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने नगर परिषद प्रशासनाने 2008 मध्ये 65 लाख रुपयांच्या खर्चाने सुसज्ज नाट्यगृह उभारले. पुढे आणखी 45 लाख रुपये खर्च करून 450 आसनांची व्यवस्था करण्यात आली. मे 2013 मध्ये नाट्यगृहाचे उद्घाटन झाले.

सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेले हे नाट्यगृह आता नाट्यकलांसाठी वापरले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात फारच थोड्या नाट्यप्रयोगांना येथे स्थान मिळाले. याऐवजी राजकीय सभा, प्रशासकीय शिबिरे, शालेय कार्यक्रम आणि लग्न समारंभ यासाठीच हे नाट्यगृह वापरले जात आहे.

नाट्यगृह कोदवली साईनगर परिसरात असल्यामुळे जवाहर चौकातील लोकांना ते गाठणे खर्चिक ठरतं. शिवाय नाटकानंतर उशिरा परतीसाठी वाहतूक सुविधा नसणे, तिकीट दर परवडत नसणे, मर्यादित आसनक्षमता ही काही मुख्य कारणे आहेत, ज्यामुळे नाट्यगृहाकडे पाठ फिरवली गेली आहे.

यामुळे आज हे नाट्यगृह बंद अवस्थेत असून, आतील खुर्च्या, साहित्य धूळ खात आहे. सांस्कृतिक परंपरेचा गौरव असलेल्या राजापूर शहरात रंगभूमीला पुन्हा जागवण्यासाठी नागरी आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नाट्यरसिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

2455626
Share This Article