GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: भटक्या कुत्र्याच्या धक्क्याने रिक्षा पलटली; प्रवासी सुखरूप पण कुत्र्याचा मृत्यू

चिपळूण : शहरातील बुरूमतळी येथील मुख्य रस्त्यावर सोमवारी एक विचित्र अपघात घडला. भटक्या कुत्र्याने थेट रिक्षा चालकाने पकडलेल्या स्टेअरिंगवरच उडी घेतल्याने रिक्षा पलटी झाली.

रिक्षेचा वेग कमी असल्याने आणि समोरून कोणते वाहन न आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या रिक्षात एक वयोवृद्ध महिला प्रवासी होत्या. या प्रकारामुळे त्या घाबरल्याने त्यांना एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र चालकासह प्रवासी महिला सुखरूप आहेत, परंतु या अपघातात त्या कुत्र्याचा मृत्यू झाला.

चिपळूण तालुक्यातील टेरव येथील परेश काणेकर हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन चिपळूणच्या दिशेने निघाले होते. या रिक्षामध्ये वयोवृध्द महिला बसल्या होत्या. शहरातील पाग पॉवर हाऊस ते चिंचनाका या रस्त्यावरून जात असताना बुरूमतळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर अचानक एका कुत्र्याने थेट रिक्षात उडी घेतली. तो कुत्रा स्टेअरिंगवरच आदळल्याने आणि अचानक हा प्रसंग घडल्याने परेश काणेकर गोंधळून गेले. त्यांनी रिक्षा सावरण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्र्याच्या धक्क्याने त्यांच्या हातातील स्टेअरिंग फिरले आणि रिक्षा पलटी होऊन अपघात झाला.

रिक्षामध्ये बसलेल्या आजी आणि परेश काणेकर हे देखील रिक्षासह रस्त्यावर कोसळले. यावेळी या परिसरात कोणतेही दुसरे वाहन न आल्याने मोठा अनर्थ टळला. दैव बलवत्तर म्हणून आजी व परेश हे दोघेजण बालंबाल बचावले. मात्र या अपघातामुळे आजी घाबरून गेल्या. त्यांना तातडीने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. ही घटना कळताच आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. या अपघातामुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

2455994
Share This Article