GRAMIN SEARCH BANNER

दापोली : साखळोली येथे 2 घरांवर वीज कोसळली; उपकरणे जळून खाक

Gramin Varta
661 Views

दापोली : दापोली तालुक्यात परतीच्या पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास साखळोली गावात वीज कोसळून दोन घरांना आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, साखळोली येथील रामकृष्ण बर्वे आणि डॉ. राजकुमार बर्वे यांच्या घराजवळ अचानक वीज कोसळली. वीज थेट मीटर बॉक्सवर आदळल्याने क्षणातच घरातील वायरिंग पेटले आणि आग सर्वत्र पसरली. घरातील टीव्ही, इन्व्हर्टर, फर्निचर, बेड यांसह इतर वस्तू जळून खाक झाल्या. शेजारील चंद्रशेखर करमरकर यांच्या बंद घरावरही वीज कोसळल्याने मोठे नुकसान झाले.

आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्परता दाखवत दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि पाण्याच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. या बचावकार्यात पोलिस पाटील सुनील सोनू गौरत, उपसरपंच दिनेश जाधव, माजी उपसरपंच अनिल शिंदे, मंगेश गोरीवले, प्रमोद बुरटे आदी ग्रामस्थांनी मोलाची भूमिका बजावली.

या दुर्घटनेत विशाल बर्वे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने इतर कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. घटनेची माहिती मिळताच विनोद गोंधळेकर, विशाल गोंधळेकर, सागर बर्वे यांच्यासह समाजबांधव घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य हाती घेतले.

यापूर्वीच दोन दिवसांपूर्वी जालगाव येथे वीज कोसळून काही घरांतील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली होती. सततच्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने वीज कोसळण्याच्या घटनांपासून बचावासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3391991
Share This Article