GRAMIN SEARCH BANNER

पाली ते साखरपा बस प्रवासात महिलेचे दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Gramin Varta
12 Views

रत्नागिरी: एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाली एस.टी. स्टँड ते मुर्शी साखरपा या प्रवासादरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करुणा कैलास साळवी (वय ४३, व्यवसाय- घरकाम, रा. मठ कुंभारवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. करुणा साळवी या बुधवारी (१३ मे) सकाळी साडेसात ते नऊ वाजेच्या सुमारास पाली एस.टी. बस स्थानक ते मुर्शी साखरपा असा एस.टी. बसने प्रवास करत होत्या. प्रवास करत असताना त्यांनी आपले सोन्याचे दागिने एका छोट्या पर्समध्ये ठेवून ती पर्स एका काळ्या-पांढऱ्या रंगाच्या कापडी पर्सच्या आतील कप्प्यात सुरक्षित ठेवली होती. या प्रवासादरम्यान बसमधील गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने करुणा साळवी यांच्या संमतीशिवाय कापडी पर्समधील छोटी पर्स उघडून त्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.

घरी आल्यानंतर पर्समध्ये मंगळसूत्र नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या जुन्या वापरत्या दोन पदरी मंगळसूत्रामध्ये काळे व सोन्याचे मणी असून त्याला सोन्याचे पेंडल आहे. या दीड लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या मंगळसूत्राच्या चोरीबाबत करुणा साळवी यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवार, १५ मे रोजी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एसटी बसमधील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3390077
Share This Article