GRAMIN SEARCH BANNER

गुहागर तालुक्यातील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह जंगलात आढळला; महिनाभरापासून सुरू होता शोध

गुहागर: तालुक्यातील कुडली माटलवाडी येथून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आवरे येथील माळरानातील झाडीझुडपात आढळून आला आहे. संदीप बबन माटल असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे गुहागर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप माटल हे ४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आपल्या कुडली माटलवाडी येथील राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही पत्ता लागला नव्हता. अखेर १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास मौजे आवरे येथील माळरानातील जंगलमय परिसरात झाडीझुडपात एक मृतदेह स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हा मृतदेह बेपत्ता असलेल्या संदीप माटल यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात १ एप्रिल रोजी रात्री ७:५५ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिनाभरानंतर मृतदेह आढळून आल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. संदीप माटल यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गुहागर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे जंगलात मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3471906
Share This Article