GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत राडा; लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
91 Views

दापोली: जमिनीच्या हद्दीवरील कुंपण तोडल्याच्या कारणावरून दापोली तालुक्यातील कलानगर येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बेकायदा जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, कलानगर येथील सर्व्हे नंबर २९ मधील जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला. फिर्यादी भाग्यश्री भागोजी दाभोळकर यांच्या भावाच्या जमिनीच्या पश्चिम बाजूला असलेले सिमेंट आणि तारेचे कुंपण आरोपी दामोदर श्रीपत पवार, अंकुश पवार, अमर पवार, इंदू पवार, चांगणा पवार आणि अंकिता पवार यांनी बेकायदा जमाव जमवून तोडून टाकले. या नुकसानीबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी गेल्या असता, आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. अंकुश, अमर आणि इंदू पवार यांनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. यावेळी सोडवासोडव करण्यासाठी आलेल्या मजूर महिला आणि फिर्यादीच्या वहिनीलाही आरोपींनी अश्लील शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

​या घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचा भाऊ अशोक इवलेकर, प्रकाश इवलेकर आणि इतर नातेवाईक घटनास्थळी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी मुख्य आरोपी दामोदर पवार याने अशोक इवलेकर यांच्या पाठीवर काठीने प्रहार केला, तर ऋतिक इवलेकर याला चावा घेऊन जखमी केले. या मारहाणीत अशोक इवलेकर आणि ऋतिक इवलेकर हे दोघे जखमी झाले आहेत.

​विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी २६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपकाही आरोपींवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3199256
Share This Article