GRAMIN SEARCH BANNER

निवती समुद्रकिनारी विराट कोहलीचे 15 फुटांचे भव्य चित्र!

कुडाळ : कला आणि क्रिकेट यांचा अनोखा संगम सिंधुदुर्गात पाहायला मिळाला आहे. कुडाळ-पाट परिसरातील सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे तब्बल 15 फूट उंचीचे भव्य चित्र निवती समुद्रकिनारी साकारले असून, ही कलाकृती पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

अल्पेश यांनी हे चित्र रांगोळी आणि कलर स्प्रेच्या माध्यमातून रेखाटले आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या प्रतिकूल हवामानातही त्यांनी केवळ दीड तासांत ही अद्वितीय कलाकृती पूर्ण केली. जोरदार वारे आणि पावसाच्या सरी यावर मात करत त्यांनी ही कलाकृती साकारली, यामध्ये त्यांना विठ्ठल माधव, भावेश घारे आणि मंजिरी घारे या मित्रमंडळींची मोलाची साथ लाभली.

अल्पेश यांना लहानपणापासूनच चित्रकलेची गोडी असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण पाट हायस्कूल येथे झाले. शालेय जीवनातच त्यांनी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलाप्रदर्शनांतही त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांना भव्यदिव्य कलाकृती काढण्याची खास हौस आहे.

यापूर्वीही मोठमोठ्या कलाकृती समुद्रकिनारी रेखाटल्या आहेत. त्यांच्या कलाकृती साठी किनारा हाच कॅनव्हास आहे. कलाशिक्षक संदीप साळसकर यांच्या कलाविषयक उपक्रमात अल्पेशचा नियमित सहभाग असायचा. अल्पेश घारे हे विराट कोहली यांचे खूप मोठे चाहते असून, क्रिकेटप्रेमातूनच त्यांना ही कलाकृती साकारण्याची प्रेरणा मिळाली. सध्या ही कलाकृती समुद्रकिनारी पाहण्यासाठी पर्यटकांची व स्थानिकांची मोठी गर्दी होत आहे.

Total Visitor

0217948
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *