रत्नागिरी: लांजा येथे फर्निचरचे काम करत असताना लोखंडी कटर हाताला लागून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. नंदकुमार रवींद्र पांचाळ (वय ३०, रा. लांजा) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार पांचाळ लांजा येथे फर्निचरचे काम करत असताना अचानक लोखंडी कटर त्याच्या हाताच्या पंजाला लागला. या अपघातानंतर त्याला तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, जखम गंभीर असल्याने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत करण्यात आली आहे.