रत्नागिरी: “ग्रामीण भागातील राजकारण आता एखाद्या खाजगी कंपनीसारखे झाले आहे, जिथे पैसे देणाऱ्या बलाढ्य नेत्याची खोटी स्तुती करणारे ‘सेल्समन’, मते विकत घेण्यासाठी ‘एजंट’ आणि पैसे घेऊन मतदान करणारे मतदार हे ‘गिऱ्हाईक’ अशा परखड शब्दांत गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्ह्याचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका केली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले.
सुहास खंडागळे यांनी सोशल मीडियावर मांडलेल्या आपल्या भूमिकेत म्हटले आहे की, या नव्या राजकीय कंपनीत सामान्य माणसाच्या प्रश्नांना जागाच उरलेली नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याच्या नादात मूळ विकासकामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी गंभीर वास्तवावर बोट ठेवत म्हटले की, “२०२५ साल उजाडले तरी ग्रामीण भागातील रुग्णाला सर्पदंश झाल्यास किंवा इतर गंभीर परिस्थितीत उपचारासाठी शहरात धावावे लागते. तालुका स्तरावर अद्ययावत आरोग्य सुविधांची वानवा आहे. या राजकीय कंपनीत सामान्य माणसाचा कोणताही फायदा नाही हेच सत्य आहे.”
पैसे घेऊन मतदान करणाऱ्या मतदारांना थेट सवाल करत सुहास खंडागळे म्हणाले, “पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांनो, तुम्ही केवळ एक ‘गिऱ्हाईक’ आहात, हे तुमच्या कधी लक्षात येणार?”
आगामी निवडणुकांमध्ये मतदारांनी योग्य उमेदवारालाच मत द्यावे, असे आवाहन गाव विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पैशाच्या राजकारणाला बळी न पडता गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या प्रतिनिधीलाच निवडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.