चिपळूण : कुंभार्ली घाटातून चिपळूण-कऱ्हाड मार्गे होणारी एसटीची वाहतूक मागील १३ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे चिपळूण आगाराचे १३ दिवसांत तब्बल ५२ लाखांचे नुकसान झाले आहे. या मार्गावरील वाहतूक कधी सुरू होईल हे आता निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पाटण तालुक्यात वाजेगाव व शिरळ या ठिकाणी अतिवृष्टीने १६ जूनला पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे १७जूनपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा सर्वाधिक फटका एसटीला बसला आहे. चिपळूण आगारातून या मार्गावर सकाळी ६.३० ते रात्री ११.५० पर्यंत तब्बल ३४ फेऱ्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात सोडल्या जातात. काही गाड्या कर्नाटक राज्यातील बेळगावला सोडल्या जातात. सर्वाधिक गाड्या पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, बारामती या भागात सोडल्या जातात. चिपळूण-कराड मार्ग अजूनही रेल्वेने जोडलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतुकीला चांगले भारमान मिळते. सुमारे ६ हजार किमी एसटीची दिवसा वाहतूक होते.
एका चिपळूण आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटीमुळे चिपळूण आगाराला दिवसा सुमारे चार लाखाचे उत्पन्न मिळते. चिपळूण आगाराच्या सर्वाधिक उत्पन्नाचा हाच मार्ग आहे. मात्र १७ जूनपासून एसटीची वाहतूक बंद असल्यामुळ चिपळूण आगाराचे
लाखोचे उत्पन्न बुडाले आहे. चिपळूण आगारातून काही फेऱ्या साखरपामार्गे सोडल्या जातात. मात्र या मार्गावर आधीच संगमेश्वर, देवरूख, रत्नागिरी, लांजा, राजापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगाराच्या फेऱ्या सुरू असतात. त्यामुळे चिपळूणमधून येणाऱ्या फेऱ्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही काही वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र पाटण तालुक्यात वाजेगाव व शिरळ या ठिकाणचा रस्ता अजूनही अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. तो भविष्यात कधी सुरू होईल याचा अंदाज नाही त्यामुळे एसटीचे लाखोचे नुकसान होत आहे.
या मार्गावरील वाहतूक लवकर सुरू झाली तर तोटा कमी होणार
चिपळूण-पाटण-कऱ्हाड मार्गाने होणाऱ्या एसटीच्या प्रवासी वाहतुकीने चिपळूण आगाराला दिवसा सुमारे चार लाखांचे उत्पन्न मिळत होते. १७ जूनपासून ही वाहतूक थांबली आहे. त्यामुळे चिपळूण आगाराचे सुमारे ६ हजार किमी कमी झाले असून त्यातून एसटीचा दिवसा सुमारे चार लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील वाहतूक लवकर सुरू झाली तर तोटा कमी होईल.
दीपक चव्हाण, चिपळूण आगारप्रमुख