रत्नागिरी : समाजाच्या सेवेसाठी आम्ही बांधील आहे. म्हणून एखाद्याने दिलेल्या तक्रारीनंतर त्यांना पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारण्याची गरज नाही . तपासामध्ये काय प्रगती आहे, याची माहिती संबंधित तक्रारदाराला फोन किंवा व्हॉटसअॅपवर कळविली जाणार आहे, यासाठी मिशन प्रगती अभियान राबविले जात आहे. तर ज्येष्ठांना कोणतीही मदत लागली तर त्यांना तत्काळ मदतीसाठी मिशन प्रतिसाद राबवविले जात आहे. पोलिस आणि जनतेचे संबंध अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने दोन्ही मिशन नव्या जोमाने राबविण्याचा निर्णय दलाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.
पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. बगाटे म्हणाले, गृह विभागाच्या नव्या कायद्यानुसार पोलिस ठाण्यात तक्रार देणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला तपासाबाबत काय प्रगती आहे, हे पाहण्यासाठी पोलिस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. परंतु आता मिशन प्रगतीमध्ये घरबसल्या तक्रारदाराला केसबाबत अपडेट मिळणार आहेत. संबंधित तपालिस अंमलदाराकडुन गुन्हा कोणत्या स्तरावर आहे, ही माहिती मोबाईलद्वरे किंव व्हॉट्सअॅप द्वारे दिला जाणार आहे. त्यावर वरिष्ठांचेही नियंत्रण असणार आहे. यामुळे पोलिस दलाचा कारभार अधिक गतिमान आणि पारदर्श होण्यास मदत होणार आहे. एवढेच नाही, तर मिशन प्रतिसाद हे देखील तेवढ्याच प्रभावी राबविण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठांसाठी ९६८४ ७०८३१६, ८३९०९२९१०० हे दोन हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहे. ज्येष्ठांना घरगुती काही अडचण असेल किंवा त्यांना छळ होत असले, उपचारासाठी मदत हवी असेल अशा कोणत्याही मदतीसाठी पोलिस दल तत्काळ घटनास्थळी दाखल होणार आहे. तिथे पोहचल्याबाबत फोटो घेऊन त्यांना काय मदत केली, याचाही फोटो संबंधित यंत्रणेकडुन प्रतिसाद घेतला जाणार आहे. यापूर्वी देखील हे यंत्रणा होती, परंतु त्याला नवऊर्जा देण्याचे काम आम्ही करत आहोत. आपले सरकार पोर्टलवकर गृह विभागाच्या १७ सेवा ऑनलाईन आहेत. परंतु त्याची जनजागृती नसल्याने त्याला फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या सेवांचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी यावेळी दिली.