GRAMIN SEARCH BANNER

राकेशचा सांगाडा शोधण्यासाठी पोलीसांची आंबा घाटात शोधमोहिम

Gramin Varta
18 Views

पोलीसांच्या टिमने आंबा घाट परिसर काढला पिंजून; मात्र हाती काहीच नाही

रत्नागिरी- रत्नागिरी मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरूणीच्या खून प्रकरणातील संशयीत आरोपी दुर्वास पाटील याने आणखी एका खूनाची कबूली दिली असून त्याने वाटद खंडाळा येथील राकेश जंगम (वय-२८) याचा खून करून त्याचा मृतदेह आंबा घाटात फेकल्याची कबूली पोलीसांना तपासादरम्यान दिली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी केलेल्या खूनाचा आता उलगडा झाला असल्यामुळे राकेशचा सांगाडा शोधण्यासाठी पोलीसांच्या टिमने सोमवारी आंबा घाटात दिवसभर शोधमोहिम राबवली. मात्र पोलीसांना हाती काहीच लागले नाही.

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या गर्भवती प्रेयसी भक्ती मयेकर हिचा थंड डोक्याने खून करून मृतदेह आंबा घाटात फेकणाऱ्या दुर्वास पाटील याने भक्तीच्या खुनाची चौकशी सुरू असतानाच पोलिसांसमोर राकेश जंगम याचाही खून केल्याची कबुली दिली. कोल्हापूरला जायचे आहे असे सांगून त्याने. राकेशला गाडीत सोबत घेतले. खंडाळा ते कोल्हापूर प्रवासादरम्यानच राकेशचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला. असे पोलीस तपासात पुढे आले आहे.

दुर्वास पाटील याने राकेश जंगम याचा एक वर्षापूर्वी म्हणजेच ६ जून २०२४ रोजी खून करून त्याचा मृतदेह आंबा घाटात टाकल्याची कबूली दिल्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम हे राखीव पोलीस दलाला घेऊन आंबा घाट परिसरात सोमवारी दाखल झाले. यावेळी देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे उपस्थित होते. डिवायएसपी सुरेश कदम यांनी ३० जणांच्या टिमला मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर ३० जणांच्या चमूने ज्याठिकाणी राकेशचा मृतदेह टाकण्यात आला तो परिसर पिंजून काढला. पोलीस दोरीच्या सहाय्याने थेट दरीत उतरले होते.

सकाळी ११ वाजता सुरू झालेली शोधमोहीम सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरूच होती. सगळा परिसर पिंजून काढला तरी पोलीसांच्या हाती काहीच लागले नाही. तर यानंतर पुढे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी सांगितले. दरम्यान, वर्षभरापूर्वी खून करून टाकलेल्या मृतदेहाचे आता वर्षभरानंतर अवशेष शिल्लक राहिले असतील का? की त्याचे पूर्णपणे विघटन झाले असेल? अशी मतमतांतरे ऐकावयास मिळत आहेत.

Total Visitor Counter

2651762
Share This Article