GRAMIN SEARCH BANNER

शासनाच्या विविध योजनांतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज-जिल्हा न्यायाधीश-1 चिपळूण डॉ. अनिता नेवसे

Gramin Varta
92 Views

रत्नागिरी : शासनाच्या विविध योजनांअंतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज आहे. भारतीय राज्य घटनेने दिव्यांगांचा विकास करण्यासाठी, विशेष प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीकोनातून विशेष शाळांचे शासकीय योजनेअंतर्गत प्रयोजन केले आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश-1 चिपळूण डॉ. अनिता नेवसे यांनी केले.

बालन्यायालय समिती उच्च न्यायालय मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शारिरीक / बौध्दीक दुर्बल (दिव्यांग) मुलांचा शोध घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी तालुका विधी सेवा समिती चिपळूण व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. नेवसे यांनी दिव्यांग व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जीवन जगता यावे, योग्य प्रशिक्षण घेऊन आपले कौशल्य दाखवता यावे यासाठी शासनाच्या विविध योजनेबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. दिव्यांगांसाठी शासकीय आस्थापनेत योग्य सोयीसुविधा म्हणजेच लिफ्ट, रॅम्प उपलब्ध असणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरावर दिव्यांग सक्षमीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विशेष शिक्षकांची नेमणुक केली जाते याबाबत माहिती दिली.
गटशिक्षणाधिकारी श्री. इरनाक यांनी या शिबिरात ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिराचा उद्देश समजावून सांगितला.  बालकांची व कागदपत्रांची तपासणी करून युडीआयडी कार्डचे वितरण केले. अपंगत्व प्रमाणपत्राबाबत माहिती दिली.

शिबिरासाठी पंचायत समिती चिपळूण या शाळांमधील शिक्षक तसेच विविध आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बळवंत, डॉ. नरवाडे, कर्मचारी वर्ग व दिव्यांग व्यक्ती तसेच त्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

2648477
Share This Article