रत्नागिरी: तालुक्यातील गणेशगुळे गावच्या थेट सरपंच सौ. श्रावणी विक्रांत रांगणकर यांच्या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायत सदस्याने अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. परंतु त्याला सामोरे जाण्याआधीच त्यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे अविश्वास ठरावाची वेळच आली नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरात या घडामोडी चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गट, भाजप आणि शिंदे गट यांच्यात चुरस होती. यामध्ये थेट सरपंच निवडणुकीत शिंदे गटाच्या सौ. श्रावणी रांगणकर या बहुमताने विजयी झाल्या होत्या. सात सदस्यांपैकी सहा शिंदे गटाचे तर एक सदस्य भाजपाचा निवडून आला. त्यामुळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व होते. उपसरपंचपदी श्री. प्रसाद सुनील तोडणकर यांची निवड झाली होती.
प्रारंभी दोन वर्षे कारभार सुरळीत सुरू होता. मात्र, नंतर महिला सरपंच यांनी सदस्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र निर्णय घेत ग्रामपंचायतीचा कारभार सुरू ठेवला. त्यामुळे गावात विविध अडचणी उद्भवल्या. ग्रामस्थांना निवडणुकीत दिलेली आश्वासने अपूर्ण राहिली. यामुळे संतप्त सदस्यांनी सरपंचांविरुद्ध थेट अविश्वास ठराव दाखल केला.
सदर ठराव तहसीलदारांकडे सादर करण्यात आला होता. ३० जून रोजी सुनावणीचे आदेशही जारी झाले होते. मात्र, या सुनावणीदरम्यान अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची भीती होती. म्हणून २५ जून रोजी सरपंच सौ. श्रावणी रांगणकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला. २ जुलै रोजी विशेष मासिक सभेत राजीनामा मान्य करण्यात आला आणि सातही सदस्यांनी त्यास मंजुरी दिली.
उपसरपंच तोडणकर यांची खंत
यासंदर्भात उपसरपंच श्री. प्रसाद सुनील तोडणकर म्हणाले, “आम्ही सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गावाच्या विकासासाठी विश्वासाने सरपंच निवडले. पण त्यांनी विश्वासघात केला. आम्ही पाच वर्षांसाठी निवडून दिलं होतं, मात्र अडीच वर्षांतच ही वेळ आली, हे गावासाठी दुर्दैव आहे.”
गणेशगुळे ग्रामपंचायतीत राजकीय खळबळ ; अविश्वास ठरावाआधीच सरपंच श्रावणी रांगणकर यांचा राजीनामा

Leave a Comment