GRAMIN SEARCH BANNER

दसऱ्याच्या दिवशी आयोजित ‘संगीत बिबट आख्यान’वरून नागरिकांमध्ये नाराजी; वन विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Gramin Varta
73 Views

चिपळूण  : येथील महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने आयोजित ‘संगीत बिबट आख्यान’ या प्रबोधनात्मक नाट्यप्रयोगाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित झालेल्या या कार्यक्रमाला केवळ ५०-६० रसिक प्रेक्षकांची उपस्थिती होती. या वेळापत्रकावरून आणि आयोजनाच्या नियोजनावरून अनेक नाट्यप्रेमींमध्ये संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकाराविषयी अखिल भारतीय नाट्य परिषद, चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी संताप व्यक्त केला आहे. “वन विभागाने या नाटकासाठी नागरिक येऊ नयेत, याचीच काळजी घेतली होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून, याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले.

सणाच्या दिवशीच नाट्यप्रयोग का?

दसरा हा हिंदू धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी अनेक नागरिक वाहनांची पूजा, शस्त्रपूजा तसेच कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. अशा दिवशी, तेही सकाळी ११ वाजता नाट्यप्रयोग आयोजित केल्याने अनेकांना या नाटकाला उपस्थित राहणे शक्य झाले नाही. काही नागरिकांनी तर “वन विभागाने हा प्रयोग नागरिकांऐवजी स्वतःसाठीच आयोजित केला होता का?” असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे.

नाट्यप्रयोगाची गुणवत्ता व आशय

‘संगीत बिबट आख्यान’ हा नाट्यप्रयोग वनवाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता. लांजा येथील मकरंद सावंत यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या प्रयोगात मानव आणि बिबट्या यांच्यातील सहअस्तित्व, बिबट्याचे प्रकार, आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला. “बिबट्या हा आपला शत्रू नसून मित्र आहे,” असा सकारात्मक संदेशही या नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला.

नाटकाची मांडणी, संगीत, संवाद, आणि सादरीकरण अत्यंत प्रभावी असून, हा प्रयोग अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा होता, अशी भावना अनेक रंगप्रेमींनी व्यक्त केली.

वन विभागाचा हेतू योग्य, पण अंमलबजावणीत त्रुटी

महाराष्ट्र वन विभागाचा उद्देश नागरिकांमध्ये बिबट्यांबाबत जनजागृती करणे हा होता, हे खरे असले तरी कार्यक्रमाच्या नियोजनात तथ्य आणि भावनांचा विचार न झाल्याने अपेक्षित परिणाम झाला नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती प्रेक्षकांपेक्षा जास्त होती, ही बाब अधिक खटकण्यासारखी ठरली.

वन विभागाने हा कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठीच ठेवला ?

“‘संगीत बिबट आख्यान’ हा नाट्यप्रयोग अत्यंत दर्जेदार होता, याबाबत शंका नाही. मात्र दसऱ्यासारख्या महत्वाच्या सणाच्या दिवशी, तीही सकाळी ११ वाजता असा कार्यक्रम ठेवणे हे सामान्य प्रेक्षकांप्रती असंवेदनशील नियोजन आहे. वन विभागाने हा कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी, तो आपल्या अधिकाऱ्यांसाठीच मर्यादित ठेवला की काय, अशी शंका येते. आम्ही या दुर्लक्षाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार दाखल करू.”

– डॉ. प्रशांत पटवर्धन, अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, चिपळूण शाखा

Total Visitor Counter

2645294
Share This Article