GRAMIN SEARCH BANNER

लांजातील शहर विकास आराखड्याला स्थगिती मिळवून देण्यासाठी मंत्री नितेश राणे प्रयत्नशील

Gramin Varta
22 Views

लांजा तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

लांजा : लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला नागरिकांचा असलेला विरोध आणि लोकांची बाजू समजावून घेऊन राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन लांजा-कुवे बचाव समितीला दिले आहे. त्यांच्या आश्वासनानुसार भविष्यात लांजा डीपीला स्थगिती मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून नागरिकांच्या संघर्षाच्या लढ्यात मंत्री नितेश राणे हेच खऱ्या अर्थाने तारणहार ठरणार आहेत, अशी माहिती लांजा तालुका भारतीय जनता पार्टी यांनी दिली आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
         
लांजा नगरपंचायतीच्यावतीने जाहीर केलेल्या प्रारूप विकास कृती आराखडावरून वाद सुरू झाला असून या पार्श्वभूमीवर लांजा तालुका भाजप पक्षाच्यावतीने मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी भाजप दक्षिण तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, उत्तर अध्यक्ष विराज हरमले, जिल्हा निमंत्रित सदस्य विजय कुरूप, प्रमोद कुरूप, माजी नगरसेवक मंगेश लांजेकर व इकबाल गिरकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, २७ मार्च २०२५ रोजी लांजा शहराचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला होता. या आराखड्यासंदर्भात हरकती घेण्यासाठी २८ एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या प्रचंड रोषामुळे ही मुदत १५ मे पर्यंत वाढवून देण्यात आली होती. त्यानंतर मुदत संपल्यानंतर विकास आराखड्या विरोधात नगरपंचायतीकडे तब्बल १५०० हरकती अर्ज आले होते. या हरकतींवर आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४ ते ७ ऑगस्ट दरम्यान सुनावण्या होणार आहेत.
          
असे असले तरी मुळातच हा प्रारूप विकास आराखडा तयार करताना लोकांना विश्वासात न घेता तो कार्यालयात बसून तयार केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. कारण या विकास आराखड्यामुळे लांजा-कुवे शहरातील नागरिकांची घरेदारे, गोठे उध्वस्त होणार आहेत. त्यांच्या घरादारांवर नांगर फिरणार आहे, त्याप्रमाणे असंख्य त्रुटी या विकास आराखड्यात आहेत. म्हणूनच या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी यासाठी लांजा-कुवे बचाव समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांपासून त्या विरोधात शासन दरबारी लढा सुरू आहे. यामध्ये खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्याकडे देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
          
या पार्श्वभूमीवर रविवारी २७ जुलै रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची लांजा कुवे बचाव समितीच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी लांजा-कुवे बचाव समिती पदाधिकारी, नागरिकांची बाजू समजावून घेऊन या विकास आराखड्याला स्थगिती मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. यासाठी आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून नागरिकांची असलेली रास्त मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यांच्या माध्यमातून या विकास आराखड्याला स्थगिती मिळवून देण्यासाठी आपण ठोस प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी लांजा कुवे बचाव समितीला दिली आहे .
           
लांजा-कुवे नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे तितक्याच गांभीर्याने लक्ष देऊन, त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याला स्थगिती देण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिल्याने लांजा-कुवे येथील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. किंबहुना मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जर लांजा शहर विकास आराखड्याला स्थगिती मिळाली तर तेच खऱ्या अर्थाने लांजा-कुवे बचाव समिती आणि नागरिकांचे तारणहार ठरतील यात शंका असणार नाही.

Total Visitor Counter

3290952
Share This Article