अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय ऑनलाइन स्पर्धेत मिळवला उत्तेजनार्थ क्रमांक
राजापूर/ तुषार पाचलकर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत राजापूर तालुक्याचे नाव उंचावले आहे. तालुक्यातील पाचलकोंड धनगरवाडी येथील कुमारी मैथिली सिताराम कोकरे हिने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग घेऊन लक्षवेधी कामगिरी करत उत्तेजनार्थ (तिसरा) क्रमांक पटकावला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याच्या आणि विचारांच्या सन्मानार्थ आयोजित या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्याने आपले प्रभावी वक्तृत्व सादर केले. या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर मैथिली कोकरे हिने अत्यंत आत्मविश्वासपूर्वक आणि प्रभावीपणे आपले मत मांडले. तिची भाषाशैली अत्यंत प्रभावी, मांडणी आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि विचार संस्कारयुक्त होते. मैथिलीच्या वक्तृत्वाने उपस्थित परीक्षकांची आणि श्रोत्यांची मने जिंकली. तिने अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध पैलू आणि त्यांचे समाजकार्य अत्यंत ओघवत्या भाषेत मांडले.
तिच्या या उल्लेखनीय आणि प्रभावी कामगिरीबद्दल तिला स्पर्धेत उत्तेजनार्थ (तिसरा) क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत यश मिळवून, मैथिलीने आपल्या तालुक्याचा आणि गावाचा मान वाढवला आहे. मैथिलीने प्राप्त केलेला हा यशाचा टप्पा तिच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे, अभ्यासाचे आणि वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे व आशीर्वादाचे फळ असल्याचे तिचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ अभिमानाने सांगत आहेत. पाचलकोंड धनगरवाडीसारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्पर्धेच्या व्यासपीठावर येऊन यश मिळवल्याबद्दल मैथिलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिचे हे यश अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.






