लांजा : माचाळ येथील निसर्गसंपन्न परिसरात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांकडून सातत्याने धुडगूस, बेशिस्त वर्तन आणि ग्रामस्थांशी दादागिरीचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारींनंतर अखेर लांजा पोलिसांनी तातडीने कारवाई केली. दै. तरुण भारत संवादने या समस्येवर प्रकाश टाकताच, पोलिसांनी २ जुलै रोजी माचाळ येथे धडक दिली आणि बेशिस्त पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे अनेक हुल्लडबाज पर्यटकांची धांदल उडाली.
निसर्गात गोंधळ, पवित्र जागांची विटंबना
गेल्या काही दिवसांपासून माचाळ परिसरात येणारे पर्यटक मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी होत्या. मद्याच्या बाटल्या फोडणे, खाण्याचे उरलेसुरले पदार्थ रस्त्यात टाकणे, अश्लील वर्तन करणे आणि ग्रामस्थांना त्रास देणे असे प्रकार वाढले होते. विशेषतः मुचकुंदी ऋषींच्या गुहेजवळ मद्यप्राशन करून त्या पवित्र स्थळाची विटंबना केली जात असल्याचा ग्रामस्थांचा संताप होता.
ग्रामस्थांचा संयम सुटला, पोलिसांची तत्काळ कृती
ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. अखेर १ जुलै रोजी दै. तरुण भारत संवादने वृत्त प्रकाशित करताच, पोलिसांनी याची दखल घेत बुधवार २ जुलै रोजी धडक मोहीम राबवली. या कारवाईत अनेक बेशिस्त पर्यटकांना दंड ठोठावण्यात आला.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, फौजदार सचिन भुजबळराव, पोलीस शिपाई किशोर पवार, महिला पोलीस प्रियांका कांबळे आणि चालक उमाजी बजागे आदींनी सहभाग घेतला.
पोलीसांचा इशारा :शिस्त पाळा, अन्यथा कडक कारवाई
“पर्यटनस्थळी येणाऱ्या प्रत्येकाने निसर्गाचं आणि स्थानिक संस्कृतीचं भान ठेवून जबाबदारीने वागावं. बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही. यापुढे अशा वर्तनावर अधिक कडक कारवाई करण्यात येईल.”
– निळकंठ बगळे, पोलीस निरीक्षक, लांजा पोलीस ठाणे
पर्यटन म्हणजे निसर्गात रमणं, गोंधळ नव्हे!
माचाळ सारखी ठिकाणं ही निसर्गप्रेमींसाठी आनंददायक ठरतात, पण काही बेशिस्त पर्यटकांमुळे संपूर्ण पर्यटनस्थळांची प्रतिमा मलीन होते. पर्यटन म्हणजे केवळ मौजमजा नव्हे, तर एक जबाबदारी देखील आहे. निसर्ग, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृतीचं रक्षण करणं हे प्रत्येक पर्यटकाचं कर्तव्य आहे.
लांजातील माचाळ येथे मद्यधुंद पर्यटकांची दादागिरी; पोलिसांची धडक कारवाई
