क्युआर कोड स्कॅन करा आणि रेशनकार्डमध्ये नाव घालणं, कमी करण्याची पडताळणी करू शकता
रत्नागिरी :जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना शिधापत्रिका आणि रेशनधन्यासंदर्भातील सेवा आता अधिक सुलभ होणार आहेत. महसूल सेवा पंधरवडा आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या संयुक्त नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत रेशनशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी विशेष क्यूआर कोड सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.
नवीन क्यूआर कोडच्या मदतीने नागरिकांना खालील सेवा मिळू शकतात :
ई-केवायसी : शिधापत्रिका डिजिटलरीत्या पडताळणी करणे
नाव समावेश/कपात : शिधापत्रिकेत नाव घालणे किंवा कमी करणे
धान्यपुरवठा माहिती : मिळणाऱ्या रेशन धान्याचे तपशील व गुणवत्ता तपासणे
अभिप्राय नोंदविणे : आपल्या रेशन दुकानाविषयी प्रतिक्रिया देणे
हे क्यूआर कोड प्रत्येक तहसील कार्यालय, तालुका व जिल्हा पुरवठा कार्यालय तसेच सर्व रेशन दुकाने येथे लावण्यात आले आहेत. मोबाईल कॅमेरातून कोड स्कॅन केल्यावर नागरिकांना तात्काळ आवश्यक माहिती मिळेल.
या उपक्रमामुळे शिधापत्रिका संदर्भातील अर्ज, बदल किंवा तक्रारीसाठी कार्यालयीन फेऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. ग्रामीण भागातही ही सेवा उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठी सोय होणार आहे.
आता नागरिकांना एकाच क्लिकवर रेशनशी संबंधित सर्व माहिती मिळणार : रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाचा नवा उपक्रम
