सचिन यादव / संगमेश्वर
कातूर्डी – संगमेश्वर मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास कोंड उमरे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आणखी एक अपघात घडला. कातूर्डीकडून संगमेश्वरकडे येणारी एसटी बस रिक्षाला साईड देताना रस्त्याच्या कडेला घसरली. सुदैवाने बसमध्ये असलेल्या ५० हून अधिक प्रवाशांपैकी कोणालाही इजा झाली नाही.
गेल्या पंधरा दिवसांत या मार्गावर एसटीच्या तिसऱ्या दुर्घटनेची नोंद झाली आहे. यामुळे एसटी चालकांच्या बेफिकीर वाहनचालकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधी याच मार्गावर एका एसटीने विजेच्या खांबाला धडक दिली होती. तर आठवडाभरापूर्वी कारभाटलेजवळ महिंद्रा टेम्पो आणि एसटीची धडक होऊन टेम्पो चालक गंभीर जखमी झाला होता.
शास्त्री पूल – नायरी – निवळी – कातूर्डी हा मार्ग अरुंद आणि वळणावळणाचा असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. काही चालक रस्ता मोकळा मिळाला की सुसाटपणे वाहन चालवतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी परजिल्ह्यातील एसटी चालकांच्या बेपर्वा वाहनचालकतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देवरुख आगार प्रमुखांनी संबंधित चालकांना कठोर सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच उमरे मार्गावर कळंबस्ते – तेलेवाडी परिसरात ग्रामस्थांनी काही चालकांना थेट समज दिल्याचे समजते.
दरम्यान, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेदरकार चालकांवर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.