GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर तालुक्यातील उजगाव येथे कौटुंबिक वादातून तरुणीला वडील आणि चुलत्याकडून बेदम मारहाण

Gramin Varta
495 Views

देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील उजगाव तेलीवाडी येथे एका २६ वर्षीय तरुणीला तिच्याच वडिलांनी आणि चुलत्याने लाकडी काठी व केरसुणीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तृप्ती निवृत्ती पवार या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून देवरूख पोलिसांनी तिचे वडील निवृत्ती लक्ष्मण पवार (वय ५९) आणि चुलते शंकर लक्ष्मण पवार (वय ५५) यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या राहत्या घरी घडली असून, घरगुती वादातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी तृप्ती ही तिच्या चुलतीसोबत अंगणात गप्पा मारत बसली असताना तिचे वडील निवृत्ती पवार तिथे आले आणि तुझ्यामुळे मुलगी जास्त शेफारली आहे, असे म्हणत वादावादी करू लागले. यावेळी वाद वाढल्याने वडिलांनी हातातील लाकडी चिव्याच्या काठीने तृप्तीला शरीरावर ठिकठिकाणी मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी तिचे चुलते शंकर पवार यांनीही घरात असलेल्या केरसुणीने तिला मारहाण केली. या हल्ल्यात तृप्तीच्या तोंडाला, ओठाला आणि समोरील दाताला गंभीर दुखापत झाली असून, तिने रात्र आपल्या चुलतीकडे घालवली. दुसऱ्या दिवशी तिने देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली, जिथे रुग्णालयाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3366863
Share This Article